मराठी भाषा

आपली मायबोली, मराठी भाषा. प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक माध्यमाद्वारे मराठी भाषेतून लिहीता, वाचता, बोलता यावे हा मराठी भाषा विभागाचा प्रमुख उद्देश आहे.

शास्त्रोक्त भाषा हा मराठी भाषेचा दर्जा कायम रहावा, यावर या विभागाचा विशेष भर आहे.

मराठी भाषेतील समृद्ध साहित्य जतन केले जावे, ते जास्तीत जास्त लोकप्रिय व्हावे यासाठी जुन्या आवृत्त्यांचे पुनर्मुद्रण, इलेक्ट्रॉनिक माध्यमात पुस्तके उपलब्ध करवून देणे तसेच उदयोन्मुख लेखकांना प्रोत्साहन देणे यासारखे उपक्रम या विभागातर्फे सातत्याने राबवले जात आहेत.

मराठीचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

तेल अवीव विद्यापीठात मराठीचे धडे

मराठी भाषा विभाग व इस्राएलमधील तेल अवीव विद्यापीठ यांच्यामध्ये करण्यात आलेल्या ऐतिहासिक करारानुसार तेल अवीव विद्यापीठात मराठीचे वर्ग सुरु करण्यात आले.  मराठी भाषेच्या वैश्विक कक्षा रुंदावणे व जगभरातील अभ्यासकांना, वाचकांना, सर्वसामान्य जनतेला मराठी भाषेचा अभ्यास करता यावा हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. 

मराठी पुस्तक व्यावसायिकांसाठी सवलतीचे दरात स्लॉट्स

 

मराठी पुस्तक प्रकाशन व विक्रीला प्रोत्साहन मिळावे यासाठी मराठी भाषा विभागाने इच्छुक मराठी पुस्तकांचे विक्रेते व प्रकाशकांना सवलतीच्या दरात गाळे उपलब्ध देऊ केले आहेत. मराठी पुस्तकांच्या विक्रीसाठी ५००-१००० चौरस फुटांचे गाळे सवलतीच्या दरात उपलब्ध करवून देण्याच्या सूचना  राज्यभरातील सर्व मोठ्या शहरांच्या महानगर पालिकांना देण्यात आल्या आहेत.

मराठी विश्वकोशाची लोकप्रियता 

महाराष्ट्र राज्य निर्मिती मंडळातर्फे मराठी विश्वकोश खंड २०(पूर्वार्ध)चे प्रकाशन करण्यात आले. मराठी कुमार विश्वकोशाच्या सी. डी. चे ही प्रकाशन करण्यात आले आहे. हे दोन्ही कोश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 

ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांचा भव्य सत्कार

प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते चौथे मराठी साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा शासनाने गेटवे ऑफ इंडिया येथे भव्य सत्कार केला. मराठी सारस्वताचा मुंबईच्या प्रवेशद्वारावर सत्कार होण्याची ही पहिलीच वेळ होती.

पुस्तकांचे गाव

सातारा जिल्ह्यातील मालगुंड किंवा महाबळेश्वर येथे ' पुस्तकाचे गांव ' निर्माण करण्याच्या दृष्टीने काम सुरु झाले आहे. अबालवृद्धांना या पुस्तकाच्या गावात सर्वभाषिक साहित्य उपलब्ध असेल तसेच वेगवेगळ्या साहित्यिकांची प्रत्यक्ष भेट होईल अशी व्यवस्था करण्यात येईल.

वाचन प्रेरणा दिन

दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन, १५ ऑक्टोबर यापुढे 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात येईल. यावर्षीपासून याची सुरूवात झाली आहे. शासकीय कार्यक्रमात यापुढे पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक देऊन करण्यात येईल.

राज्य अधिनियमांच्या नावांमध्ये बदल

राज्याच्या अखत्यारीतील सुमारे १९९ कायद्यांच्या नावांतील बॉम्बे शब्द काढून त्याजागी मुंबई किंवा महाराष्ट्र असा गरजेनुसार बदल करण्यात आला आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाचे नांव महाराष्ट्र उच्च न्यायालय करण्याबाबतच्या प्रस्तावाचा शासन पाठपुरावा करीत आहे.