अल्पसंख्याक विकास व औकाफ

अल्पसंख्यांक विकास विभाग समाजातील अल्पसंख्यांकांच्या सामाजिक कल्याणासाठी व आर्थिक विकासासाठी काम करतो.  अल्पसंख्यांकांमध्ये मुसलमान, ख्रिस्ती, बुद्ध, शीख, झोरोअस्ट्रीअन, जैन व ज्यू या धर्मांचा समावेश होतो.  
अल्पसंख्यांकांना आपले सामाजिक स्थान उंचावण्यासाठी तसेच देशातील इतर जनतेप्रमाणे स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी सामान व न्याय्य संधी मिळाव्यात हा या विभागाचा मुख्य उद्देश आहे. 

त्याचबरोबरीने या अल्पसंख्यांकांची विशेष पारंपरिक ओळख टिकून राहावी यासाठीदेखील हा विभाग कार्यरत असतो.  त्यादृष्टीने या लोकांच्या पारंपरिक कला व साहित्याचे जतन केले जावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. 

अल्पसंख्यांकांसाठीच्या शिक्षण संस्थांना मूलभूत सोयीसुविधांसाठी अनुदान

ज्या सरकारी, खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व व्यवसाय मार्गदर्शन केंद्रांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी अनुसूचित अल्पसंख्यांक वर्गांपैकी आहेत, अशा संस्थांना पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या विभागाकडून त्यांना आर्थिक मदत पुरवली जाते.  ज्या संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी दिव्यांग आहेत अशा संस्थांनाही अनुदान दिले जाते. 

हज हाऊस

पवित्र हज यात्रा करण्यासाठी भाविकांची मदत करण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी हज हाऊस स्थापन करण्यात आली आहेत.  पवित्र हज यात्रेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करवून घेणे, यात्रेसाठी आवश्यक असलेल्या इतर बाबी, वैद्यकीय लसीकरण तसेच इतर सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी हज हाऊस मदत करते. राज्यात मुंबई व नागपूर याठिकाणी हज हाऊस आहेत.  लवकरच औरंगाबाद येथेही हज हाऊस सुरु करण्यात येईल.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत हा विभाग चॅरिटी कमिशन व वफ्क बोर्डाकडे नोंदणी करण्यात आलेल्या मदरसांमध्ये पारंपरिक अभ्यासाबरोबरीनेच गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान व भाषा हेदेखील शिकवले जावे जेणेकरून मदरसांमधील मुलांच्या शैक्षणिक क्षमता उंचावतील, यासाठी प्रयत्न करतो. 

शिष्यवृत्ती कार्यक्रम

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करता याव्यात यासाठी या विभागातर्फे त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते.  व्यावसायिक, तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमांसाठी पंचवीस हजार रुपये व पदवी अभ्यासक्रमांसाठी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. 

स्पर्धापरीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन

प्रशासकीय तसेच बँकिंग क्षेत्रातील विविध स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या विभागामार्फत मार्गदर्शन पुरवले जाते.  मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर व औरंगाबाद या शहरांमध्ये या विभागाने पाच कोचिंग सेंटर्स सुरु केली असून स्पर्धापरीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण व्हाव्यात यासाठी अभ्यासात मार्गदर्शन, प्रशिक्षण, अभ्यासाचे साहित्य तसेच परीक्षा शुल्कासाठी मदत या कोचिंग सेंटर्समार्फत पुरवली जाते. 

उर्दू साहित्य अकादमी

उर्दू भाषा व साहित्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी १९७५ साली स्थापना करण्यात आलेली उर्दू साहित्य अकादमी अतिशय यशस्वीपणे काम करत आहे.  या अकादमीच्या मदतीने या विभागामार्फत उर्दू भाषेचे कोर्सेस चालवले जातात, उर्दू भाषेच्या प्रसारासाठी महफिल, मुशायरा, पारितोषिक वितरण समारंभ व कार्यशाळांचे आयोजन केले जाते. 

उर्दू घर

उर्दू साहित्याचे संवर्धन, संरक्षण केले जावे, त्याची लोकप्रियता वाढावी यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये या विभागामार्फत उर्दू घर स्थापन करण्यात आली आहेत.  महाराष्ट्रातील उर्दू घरांमध्ये उर्दू भाषेतील अतिशय दुर्मिळ साहित्य जातं करण्यात आले आहे व या भाषेतील चाहत्यांना भाषेच्या समृद्धतेचा आस्वाद घेण्यासाठी ते खुले करण्यात आले आहे.  मालेगाव, नांदेड व सोलापूर येथे उर्दू घर स्थापन करण्यासाठी या विभागाने मान्यता दिली आहे. त्यांचे बांधकाम वेगाने सुरु आहे.