क्रीडा व युवक कल्याण

महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती रुजावी, तिचा प्रसार व्हावा यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभाग संपूर्ण राज्यभरात क्रीडा क्षेत्राला निश्चित दिशा देण्याचे काम करीत आहे.

भारतीय खेळांना प्रोत्साहन मिळावे, त्यांची लोकप्रियता वाढावी, जागतिक स्तरावर त्यांना सन्मानाचे स्थान मिळावे, पारंपरिक भारतीय क्रीडा समारंभ, स्पर्धांचा विकास व्हावा व त्याद्वारे भारतीय खेळाडूंची क्रीडा कौशल्ये जगासमोर यावीत, यासाठी हा विभाग प्रयत्नशील आहे.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये खेळाडू तयार होण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाची नवीन योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी सर्वंकष स्पोर्ट्स मॅप (क्रीडा नकाशा) तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधून अंगभूत क्रीडा गुण असणारे अॅथलीटस् शोधून काढून त्यांना २०२० साली होणार असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी सज्ज करण्यासाठी या विभागाने व्हिजन २०२० हा उपक्रम आखला आहे.

क्रीडाविषयक मूलभूत सोयीसुविधांसाठी मदत

 

क्रीडासंस्कृतीला चालना मिळावी, नवीन पिढीमध्ये खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी खेळांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे.  सध्याच्या सोयीसुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच संपूर्ण राज्यभरात नवीन, अत्याधुनिक सोयीसुविधा विकसित करण्यासाठी क्रीडा विभागाने आर्थिक मदत देऊ केली आहे.

दिव्यांग क्रीडापटूंसाठी थेट रोजगार

 

दिव्यांग क्रीडापटूंची जिद्द व निष्ठेचा सम्मान म्हणून या विभागाने पुरस्कार विजेत्या दिव्यांग क्रीडापटूंना थेट रोजगार देण्याचे ठरवले आहे, यामुळे या क्रीडापटूंना आपला खेळ कायम सुरु ठेवता येईल. 

आंतरराष्ट्रीय योग दिन

 

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुरु केलेल्या प्रभावी उपक्रमाला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाने संपूर्ण राज्यभरात  विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.  या उपक्रमाला पुढे नेत दर महिन्याच्या २१ तारखेला राज्यातील सर्व शाळा व इतर शैक्षणिक संस्थांनी योग दिन साजरा करावा असे आवाहन या विभागाच्या वतीने यावेळी करण्यात आले.  संपूर्ण राज्यभरातून या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

क्रीडापटूंना अतिरिक्त गुण

 

राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यकता भासल्यास क्रीडा सवलतीचे २५ गुण देण्यात येणार आहे. हे विद्यार्थी नियमित खेळतात, याचे योग्य मूल्यमापन व्हावे यासाठी क्रीडा विभागाने नियमावली आखली आहे.

बालेवाडीत आता फक्त क्रीडाविषयक कार्यक्रम होणार

 

पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलाचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये क्रीडोत्तर कामांसाठी अधिक होत असे. त्यामुळे येथील संकुलातील व्यवस्थापनाचा आढावा घेऊन या क्रीडा संकुलाचा वापर फक्त क्रीडा विषयक वापरासाठी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे खेळाडूंवर अन्याय होणार नाही आणि संकुल क्रीडाविषयक कामांसाठीच वापरले जाईल.

दहीहंडी - साहसी खेळ

 

दहीहंडी उत्सवाची परंपरा लक्षात घेता या उत्सवाला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उत्सवातसहभागी होणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. गोविंदांच्या सुरक्षेची संपूर्णजबाबदारी आयोजकांवर असेल.